तो, ती आणि लॉकडाऊन

PC : Freepik



       वेळ सकाळची.. आज जरा उशीर झाला म्हणत ती धावतच बस थांब्यावर पोहोचली. बघता बघता बस सुटली देखील... अजून पंधरा मिनिटं पुढच्या बसची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.. सकाळच्या वेळीही कडक ऊन होते.. नंतर घाई नको म्हणून सुट्टे पैसे काढून ठेवले आणि सोबत निघताना घाईतही न विसरता पर्समध्ये ठेवलेला स्कार्फ काढून पूर्ण चेहऱ्यावर गुंडाळला... (प्रदूषणापासून आणि उन्हापासून चेहऱ्याचे आणि केसांचे रक्षण व्हावे म्हणून ती रोजच घरातून निघताना स्कार्फ बांधूनच निघायची.. घाईत असली तर न चुकता तो स्कार्फ घ्यायला विसरायची नाही तिच्या आवडीचा स्कार्फ होता तो; अगदी रोजच नाही पण बऱ्याचदा ती हाच स्कार्फ वापरायची.)

      बस येते का बघायचं आणि मध्ये मध्ये फोन मध्ये कोणाचा महत्वाचा संदेश आला आहे का तपासत असताना तिला बाजूने हसत गप्पांचा आवाज आला म्हणून सहज त्या दिशेने पाहिलं तर  ५-६ मुलामुलींचा गट त्यांच्यातल्याच एकाची गम्मत करत होते.. ते बघून तिलाही तिचे मित्रमंडळी आठवले असावे.. ती मनातच हसून पुन्हां बस येण्याच्या दिशेने बघू लागली. थोड्यावेळाने बस आली आणि ती चढून आत जाऊन बसली... थोड्यावेळाने पुन्हां त्या चमूचा हसण्याचा मोठयाने गप्पा मारण्याचा आवाज आला.. तिचं लक्ष पुन्हां त्याच्याकडे गेलं..ते सगळे उभे होते... एकमेकांना टाळ्या देत गप्पा मारत होते..  तिच्या लक्षात आलं त्यातला एक जण तिच्याकडे पाहतोय.. त्याची नजर विक्षिप्त/वाईट नव्हती.. तो फक्त बघत होता. हलकं स्मितहास्य त्याच्या नजरेत तिला जाणवलं.. 
     
      असेल.. मला उगीच वाटलं असेल असा विचार करून तिने नजर खिडकी बाहेर फिरवली.... काही वेळाने फोनवर बोलता बोलता तिचं पुन्हां त्याच्याकडे लक्ष गेलं...पुन्हां तेच.... काय चालू आहे हे.. असा का बघतोय? तिला समजत नव्हते अन थोडाशी चीडही येत होती जी कुठल्याही मुलीला अनोळखी व्यक्तीने असं सारखं बघितल्याने आलीच असती.. जाऊ देत म्हणत तिने दुर्लक्ष करायचं ठरवलं.. ती खिडकी बाहेर पाहत राहिली. थोड्यावेळाने तो चमू उतरण्यासाठी दरवाजाच्या दिशेने जाताना दिसला..पण ह्यावेळी मात्र तो तिच्याकडे बघत नव्हता.... बरं झालं म्हणजे तो काही मुद्दाम नसेल बघत; आपलं जसं सहज त्यांच्याकडे लक्ष जात होतं तसं त्याचंही योगायोगाने तेव्हाच लक्ष जात असावं बहुदा.. काय माहीत... असो... तिचा पुढील प्रवास शांत झाला...
     
        दुसऱ्या दिवशी पुन्हां बसची वाट पाहत अर्थातच रोजच्या सवयीने चेहऱ्यावर स्कार्फ(आज वेगळा स्कार्फ) बांधून उभी होती... तोच तिला कालचा चमू दिसला.. ते सर्वही नेहमी ह्याच वेळेस जात असतील... पुढे बस आली ती जाऊन बसली... पुन्हां आदल्या दिवशी प्रमाणेच थोडंफार घडत होतं...ते मध्येच उभे होते...पुन्हां तो मुलगा तिच्या कडे बघतोय असं तिला वाटलं. उगीच वाटत असावं म्हणून सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं परंतु काही वेळाने तिची शंका खरी ठरली... तो खरचं तिच्या कडे काल सारखाच पाहत होता... 
       
          ती काहीशी संभ्रमात तर पडली; असा काय हा मुलगा.. एखाद्या चित्रपटाप्रमाणे घडतय असं तिला वाटत असतानाच दुसरीकडे पूर्ण चेहरा स्कार्फने झाकलेला; फक्त डोळेच दिसत असतानाही तो का बरं पाहत असेल..ह्याचं कुतुहलही वाटत होतं... थोड्यावेळाने ते सगळे बसमधून उतरूनही गेले.... 
     
         तिसऱ्या दिवशी पुन्हा बस मध्ये तिला तोच अनुभव आला... चित्रपटासारखी वाटणारी ही गोष्ट तिला फारशी खटकत नव्हती.. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच असं काही घडत होतं... आणि त्याची नजर काही वाईट अर्थाची नक्कीच नव्हती...ती मनातच हसू लागली.. तोच तिच्या नजरेतले हास्य पाहून त्यानेही हलके स्मितहास्य दिले.... हे सगळं खरचं चित्रपटासारखंच आहे विचार करत ती खिडकीबाहेर बघत गालातल्या गालात हसू लागली..
     
      आता रोजचंच झालं होतं हे... तिच्या आवडीच्या स्कार्फमुळेही तो तिला ओळखू लागला होता.. रोज तो तिला बघून स्मितहास्य करायचा... ती सुध्दा नकळतपणे स्मितहास्य करायची हे तिच्या नजरेतून त्यालाही कळत होतेच... असे बरेच महिने गेले.. पण अनोळखी आहोत तर बोलायचं कसं; चांगलं नाही वाटणार म्हणून त्याचीही कधी हिम्मत नाही झाली.. एव्हाना त्याच्या मित्रमैत्रीणींनाही नजरानजर लक्षात आली होती.. अन  तेही त्याला ह्यावरून चिडवत आहेत हे तिच्याही लक्षात आलं होतं... ती हे नेहमी पहायची; गालातल्या गालात हसत राहायची... खरचं हे चित्रपटासारखं वाटायचं... तिने चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळलेला असला तरी तिच्या नजरेतून तिचं हसू तोही ओळखू लागला होता... मित्र सांगायचे की जा आणि बोल पण त्याची काही हिम्मत व्हायची नाही उतरताना तो नजरेनेच निरोप घ्यायचा..
     
     असेच दिवस जात राहिले..अन तो दिवस उजाडला... कोणाच्या ध्यानीमनी नसताना कोरोना सारख्या विचित्र विषाणूने जगाला हादरवले... पूर्ण भारतात कर्फ्यू जाहीर झाला... हळूहळू लॉकडाउन वाढतच गेला.. सर्वांचे बाहेर जाणं बंद झालं.. ह्या सगळया गंभीर स्थितीमुळे  सगळ्यांचच जीवन विस्कळीत झाले... सगळं पूर्ववत कधी होईल कोणालाच सांगता येत नव्हते... डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपलं काम निगुतीने आणि जबाबदारीने करत होते.
     
घरीच राहून सर्वांनी आपल्या कामाला सुरुवात केली.. बाहेर रस्त्यांवर फक्त पोलीस दिवस रात्र कार्य पार पाडत होते. सर्वत्र शांतता रहदारी नाही...सर्वच आपापल्या परिने परिस्थितीला सामोरे जात होते..          
     
सहा महिने गेले... तिचा फोन वाजला.. समोरून आवाज आला.. नमस्कार, एका मित्राकडून मला आपला नंबर मिळाला..आपण केकची ऑर्डर घेता का? मला अमूक दिवशी ह्या वेळेपर्यंत केक हवा आहे तर केकचे फोटो आणि दरपत्रक पाठवता का? अशी विचारणा झाली.. तिने हो म्हणून प्रतिसाद दिला. मी तुम्हाला सर्व माहिती पाठवते. कोणता केक आणि कधी, कुठे हवे हे कळवा आणि रक्कम दिलेल्या अकाउंट वर पाठवा.. अच्छा चालेल म्हणून त्यांनी फोन बंद केला. लगेचच तिने सर्व माहिती त्या नंबरवर पाठविली.. आणि थोड्याच वेळात हव्या त्या केकचा फोटो आणि सोबत तुमच्या अकाउंटला सदर रक्कम पाठविली आहे. असा संदेश तिला मिळाला... आणखी एक मागणी मिळाल्यामुळे ती खुष होती.. पैसे जमा झाल्याचे  तपासून तिनेही त्या व्यक्तीला - ठरलेल्या दिवशी वेळेत पोहोचेल ह्याची शाश्वती दिली..
       
आधी पासून केक बनवण्याची असलेली आवड लॉकडाउन मुळे मिळालेल्या रिकाम्या वेळेत एका छोट्याश्या घरगुती व्यवसायाच्या रुपात नव्याने जपायची ठरवली..भावाची स्कुटर असल्याने बऱ्याचदा ती त्याच्यासोबत जाऊन स्वतः केक पोहोचवायची सुरुवातीला प्रतिसाद तसा कमीच असला तरी सद्यस्थितीत त्याला पर्याय नव्हता.. तरी मिळणाऱ्या थोड्याफार ऑर्डरमध्ये ती समाधानी/ आनंदी होती....

ठरलेल्या दिवशी ती केक घेऊन दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. पार्किंगची कटकट नको म्हणून भाऊ कॉलनीच्या गेट बाहेरच थांबला...ती वर गेली तिथे बाहेर असलेल्या बाकावर केकचा खोका ठेवला अन दाराची घंटा वाजवली.. दार उघडताच हाताला सॅनिटायजर लावले; खोका उचलून हा तुमचा केक म्हणत केक पुढे केला... अन पाहते तर... समोर तोच.... बस मधला अनोळखी मुलगा.. इतक्या महिन्यांनी पुन्हां तिला असा अचानकपणे भेटला... तिचा विश्वासच बसत नव्हता...
       
केक पोहोचवायला एक मुलगी आल्याचे पाहून त्याला आश्चर्यच वाटले.. त्यानेही हाताला सॅनिटायजर लावून तिच्याकडून केक घेतला... आत्तापर्यंत कधी असं मुलींना काम करताना त्याने पाहिले नव्हते... आश्चर्याने त्याने विचारले; तुम्हीच केक बनवता आणि पोहोचवताही?? हो त्यात काय मी जमेल तेव्हा स्वतः जाऊन केक देते..नाही तर केक पोहोचवायला भाऊच मदत करतो असं सांगितले... अरे वा.. छान.. असं तो म्हणाला..
       
तिला पुन्हां पहिल्या सारखं हसू येत होतं कारण आधी ती स्कार्फ मध्येच त्याला दिसायची अन आत्ता तर ह्या कोवीड प्रकरणामुळे तिने मास्क घातला होता... त्याच्या लक्षातही आलं नव्हतं की ही तिच बस मध्ये भेटणारी मुलगी आहे... अन प्रत्यक्ष त्याच्याशी बोलत आहे....
     
तुम्ही स्वतः येऊन केक दिलात छान वाटलं; पुढील कामासाठी शुभेच्छा असं तो म्हणाला..अन एक स्मितहास्य केलं.. तिने त्याचे आभार मानत ज्यांच्या साठी केक मागवला त्यांना माझ्याकडूनही शुभेच्छा सांगा म्हणत स्मितहास्य केलं मास्कमुळे ते काही त्याला दिसणार नव्हतं पण हे हसरे डोळे पाहून त्याला काही आठवतय का हे ती बघत होती...  
पण तरी त्याला लक्षात आलं नाही.. तिला गंमत वाटली.. असो विसरला ही असेल विचार करून अच्छा निघते म्हणाली.... अन केक खाल्यावर आवडला / नावडला तरी नक्की कळवा असं म्हणाली... हो नक्कीच; चांगला असणार मित्रानेही तुमच्या केकचं कौतुक केलं, म्हणून तर मागवला ना; तरी नक्की सांगेन म्हणाला..
     
आता बसने जाणं होतच नसेल ना असं तिने पटकन विचारलं.. त्याला हिच्या असं विचारण्याचा अर्थ कळला नाही...
आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणजे? असा प्रश्न केला... 
हसतच ती काही नाही; बरं येते म्हणत ती वळली...

तो संभ्रमात तसाच दारात तिला जाताना पाहत उभा होता... 
मजल्याच्या शेवटच्या पायरी वर पोहोचल्यावर तिने मागे वळून पाहिले आणि पुन्हां स्मितहास्य केले...
तिच्या त्या हसऱ्या नजरेकडे पाहून नकळत ह्यानेही स्मितहास्य केले.... 
त्याने आत्ता तिला ओळखले होते...
पण ती निघून गेली होती....

तरी स्वतःच्या नशीबावर खूपच खुष होत तो... हसत हसत केक घेऊन आत गेला....
लॉकडाऊन मधली ही अनपेक्षित गोष्ट त्याला खुप आवडली होती... अन तो केकही त्याला विशेष आवडला....

© नंदिनी हाटकर.






Comments

  1. पिच्चर प्रमाणे...भाग दोन वाचायला आवडेल...ती कोण समजलं...मग तो कोण?

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा..भाग दोन? बापरे.. असं काही ठरवलं नाही मी; सहज लिहिण्याचा प्रयत्न होता हा... ती कोण कसं समजलं.. ही काल्पनिक पात्र आहेतं...

      Delete
  2. एक वेगळाच विचार करून छान लिहिले आहेत तुम्ही

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद अश्विनीजी...

      Delete
  3. Replies
    1. खूप धन्यवाद मानसीजी..

      Delete
  4. छान लिहिता तुम्ही,
    कथा फुलवलीत सुद्धा सुंदर, उत्कंठा वाढवत वाढवत वाचकाला 'पुढे काय' ची आस लावण्याची ताकद आहे यात.

    लिहीत रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद प्रविणजी...

      Delete
  5. खूप धन्यवाद कृतीजी...

    ReplyDelete
  6. मस्तच ❤️❤️✍🏼 भारी झालंय लिखाण✍🏼❤️

    ReplyDelete
    Replies
    1. 😌😇😊खूप खूप धन्यवाद❤️

      Delete
  7. Cute अशी ही story खूप आवडली..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

न भेटणारी मैत्री.....

अन पुन्हा माणूसकी भेटली.

सरतय वर्ष... काही तरी राहून जातय...