न भेटणारी मैत्री.....




PC : Google

काही नाती अशी असतात कि जी आयुष्यभर टिकतात.. त्यातही मैत्रीचं नातं म्हणजे स्पष्ट करता येणार नाही असं असतं .. त्यात हक्क, रुसवेफुगवे , भांडणे तर असतातच पण आपुलकी, जिव्हाळा, माणुसकीही असतेच..हे असं नातं आहे ज्यामुळे माणूस विश्वास म्हणजे काय हे शिकतो...

मैत्री ही ठरवून कधीच होत नाही.. सर्वांनाच माहीत आहे... प्रत्येका साठी ती वेगळी असते 'आपली ' असते, 'हक्काची' असते.
लहानपणी भांडण झालं तरी काही क्षणात सर्व विसरून पुन्हा त्याच्याशीच खेळायचा हट्ट असणारी ' मैत्री '; शाळेत पहिल्यांदाच बाकावरच्या अनोळखी चेहऱ्याशी झालेली घट्ट ' मैत्री'; महाविद्यालयात शिकताना जुन्या मित्रांना नकळत काहीसं लांब ठेवून नव्याने केलेली पण तेव्हाच ह्या नवीन मित्रांना जुन्या मैत्री चे किस्से सांगताना नकळत डोळ्यांत पाणी आणणारी 'मैत्री'; आयुष्यात पुढे जाताना कधी कधी मागे राहून गेलेली मैत्री, बऱ्याच वर्षांनी अचानक समोर आलेली पण तरी मैत्रीतला गोडवा अजूनही तसाच आहे हे समजल्यावर कंठ दाटून आणणारी मैत्री ..............

हे आणि बरच काही.... काय मग आलं ना डोळ्यांसमोर जवळचं कोणी.... अर्थातच, प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मित्र/मैत्रिणी असतात.. काही खास तर काही अति खास....

ह्या बाबतीत मी स्वतःला नेहमीच भाग्यवान समजते..आत्तापर्यंत खूप मित्र / मैत्रिणी भेटले...आणि आता 'न भेटणारी तरीही रोजच भेटणारी मैत्रीही' जपते आहे...( सोशल मिडियाचे आभार)

अगदी जन्मापासूनच  मला साथ करणाऱ्या दोन मैत्रिणी भेटल्या...'माझ्या' , 'हक्काच्या' ...ज्या कायम माझ्या सोबतच असणार कुठल्याही कारणाने दूर जाणार नाही याची मला खात्रीच नाही तर विश्वास आहे...आयुष्यात जर एकही मित्र सोबत नसला तरी ह्या दोघी कायम माझ्या सोबतच असणार... मगाशी म्हणल्याप्रमाणे कितीही रागवलो, रुसलो तरी त्यांचे स्थान कायमच पहिले आहे आणि तसेच राहील...

इतरांना शाळेत पहिल्यांदा गेल्यावर आपल्याला कोण चांगला मित्र भेटेल कोण सोबत असेल असे प्रश्न पडत असेल पण माझ्या ह्या हक्काच्या मैत्रिणींमुळे कधीच असं वाटलं नाही.. अगदी लहान असतानाचं नाही सांगता येणार तेव्हा तर प्रत्येकाशीच मैत्री होते आपली... कधी छोट्याश्या कारणाने रुसणारी तर कधी खूप काळ तशीच जिवलग राहणारी...

आता हेच पहा ना आपण मोठं होत गेलो तसं  नवीन लोक भेटले,ते मित्र कधी झाले आपलं आपल्यालाच कळलं पण नाही... तरी कितीही झालं तरी शाळेतले मित्र / मैत्रीण नेहमीच खास असतात नाही ?

मलाही खूप मित्र/मैत्रिणी भेटले.... शाळेत असताना तर एक माझी ही 'हक्काची मैत्रीण' तर होतीच, सोबत दरवर्षी आजूबाजूला बसलेल्या मैत्रिणी वेगळ्या असायच्या पण त्या प्रत्येकीसोबत आम्हा दोघींचा गट व्हायचा.. अशाच एका गटाची ही मस्त आठवण.....
            शाळेतून जाताना येताना खूप जण असायचे सोबत; पण वर्गात आम्ही कधी 'तिच्या' शेजारी बसलो नाही पण जाता येता ती नेहमी असायची सोबत; आमची चौकडी होती मस्त.. आम्ही दोघी, ती आणि तिचा लहान भाऊ....नंतर आणखी दोघे जण(एक ती आणि तिचा लहान भाऊ) सामील झाले आमच्यात, लहान होते आमच्या पेक्षा खूप,नेहमी दिसायचे, सोबत त्याची आई आणायला यायची त्यांना, मग आम्ही सोबत होतो तर तिला सांगायचो तुम्ही नका येऊ आम्ही सोडू त्यांना; वाटेतच त्यांचं घर होतं म्हणून पण आणि आम्हाला मस्ती करता यावी म्हणून पण ...  धम्माल असायची; मस्ती करत यायचो - एक जण मध्येच पुढे गेला की बाकी सर्व  जवळच लपायचो कुठेतरी; फार वेळ नाही पण मज्जा होती. अगदी दर दिवशी हा खेळ चालायचा, आता आमचं ठरवून भेटणं होत नाही; भेटतो अचानक वाटेत... अजूनही तशीच आहे 'ती'... बडबड बडबड चालूच तिची, बोलायला दमत नाही; पण घरी चल म्हणालो तर चार मजले हिला जड जातात. आम्हाला खाली उतरवेल, तास भर उभी राहून गप्पा मारेल पण वर येणार नाही अशी 'ही ' न भेटणारी मैत्रीण,  ठरवून कधीच भेटलो नाही शाळेनंतर... खूप कमी वेळा भेटलो इतक्या वर्षांत; पण तरी आमच्यातली मैत्री तशीच आहे आजही... आणि कायम राहील......

तर आज थोडं फार अशाच " न 'भेटणाऱ्या' मैत्री" विषयी......
सर्व प्रथम मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा....
तर आज मैत्री दिवसानिमित्त आपण सर्वच खूप उत्साहीत असतो.. आपापल्या पद्धतीने साजरा करतो... कोणी भेटून तर कोणी शुभेच्छा संदेश देऊन ( सोशल मिडीयाचे खूप खूप आभार)
मैत्री विषयी सर्वच खूप काही बोलतात, अनुभवतात...
पण.. हा मैत्रीत कधीही 'पण' येत नाही आणि आलाच तर त्याने खऱ्या मैत्रीत कधीही फरक पडत नाही...
आपणा सर्वांनाच खूप जवळचं असणारं हे नातचं असतं असं...पण घट्ट मैत्री असणारेच मैत्री जपतात असही नाही..
कारणं काही असो पण बऱ्याचदा सतत सोबत असणारे अचानकच दूर गेलेत हे आजच्या दिवशी तरी नक्कीच आठवतात..
तर आज अशाच काही मित्रांशी ओळख घडवते..  अन सांगा खरं आहे ना..?
दोन मित्रांची गोष्ट...म्हणजे मैत्रीची गोष्ट...न भेटणाऱ्या मैत्रीची गोष्ट... ह्यांची नावं विचाराल तर माहित नाही.. ते फक्त मित्र आहे..
त्यांच्या ओळखीने कळेल आपल्या आजूबाजूलाच आहेत ते..( ह्यातील उल्लेखांचा प्रत्यक्ष संबंध जरी नसला तरी साधर्म्य असू शकते.. तर हा केवळ एक योगायोग समजावा )

दोन मित्र : त्या दोघांमध्ये खूप छान मैत्री आहे.. अगदी दुसऱ्याच्या आनंदात नाचायला जसा पुढे तेवढाच त्याची चूक दाखवणाराही..

दोन मित्र : असे की असा एक क्षण नसेल की ते परस्परांशी भांडले नाहीत तरी त्यांची मैत्री वर्षानुवर्षे तशीच आहे...म्हणतात ना तुझं माझं जमेना पण तुझ्यावाचून करमेना..

दोन मित्र : एक मित्र काही कारणाने रागवला कारणही तसचं ठोस...दुसऱ्या मित्राला त्याची समजूत काढण्यात कमीपणा वाटला..पण दोघांचाही एकमेकांवर तितकाच जीव..तितकाच आदर...छोट्याश्या मी पणामुळे भेटणं नाही.. बोलणं नाही.. तरी एकमेकां विषयी आवर्जून खबरबात ठेवतात; एकमेकांच्या आनंदात प्रत्यक्ष नसल्या तरी मनापासून शुभेच्छा देतात ( सोशल मिडीया जिंदाबाद)

दोन मित्र : दोघांच्या आवडी निवडी सारख्याच..एकत्र मिळून नवा उपक्रम चालू केला जातो... सुरुवातीला जो तेरा हे वो मेरा अन जो मेरा हे वो तेरा... नव्याची नवलाई संपते..मग पुन्हा ह्या सगळ्याचा सर्वेसर्वा कोण.. मीच निर्णय घेणार, मला विचारल्याशिवाय काही ठरवायचं नाही.. त्यावरून रुसवे फुगवे... पण चालू झालेले कार्य थांबवायचं नाही असं दोघांनाही वाटतं.. म्हणून फक्त काम एकत्र करणार पण आधी सारखी मजा मस्ती नाही उलट इतरांसमोर अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवणार.. अन आपल्याच इतर मित्रांसमोर स्वतःच्या नकळत स्वतःसोबत दुसऱ्या बद्दलचं मत किंवा वागण्या- बोलण्याचा दृष्टीकोण बदलवणार...

दोन मित्र ( एकाच गटात असणारे ) : बालपणापासून एकत्र वाढलेले, शिकलेले, अभ्यास म्हणा, खेळ म्हणा, सणवार असो सदा एकत्र असणारे, काही निमित्ताने नव्या मित्रांशी (गटाशी ) जोडले जातात, सगळे एकत्र असतानाही काय बिनसतं हे कोण ठरवणार ? जर त्या गटासोबत असणारी मैत्री दोघांचीही तेवढीच तर मग काही गोष्टी का एक जण दुसऱ्यापासून लपवतो.. ग्रुप जर सर्वांचा असतो तर ही लपवाछपवी का मध्ये येते ? तेही आपल्या बालपणींच्या मित्रांसोबत ? आणि ह्या दोघांमध्ये एकाला एखादी गोष्ट माहित नसेल अन कधी सर्वांसोबत असताना असा विषय निघालाच अन ज्याला माहीत नसेल त्याने सहजच विचारलं - की का काय झालं होतं मला ह्या सर्वाची कल्पना नाही.. तर ह्याचाच जवळचा मित्र त्याला असं कसं म्हणू शकतो; की हे बघ हे माझे मित्र आहेत तर त्यांच्या बद्दल सगळ्याच गोष्टी मी नाही सांगू शकत.. आणि ते ही ह्या नंतर ओळख झालेल्या मित्रांसमोर.. ?? त्या जवळच्या मित्राला काय वाटत असेल अशा वेळीस.. ?? एकाच गटात राहून हा फक्त माझा मित्र असं कसं काय होऊ शकतं ?


दोन मित्र  : कुठे तरी भेटलेले (शाळा, महाविद्यालय, किंवा  आणखी कुठेही ) , खूप घट्ट नाही पण छान अशी ओळख झालेले मित्र, कमी काळात झालेली अशी ह्यांची दोस्ती.. तरी एकमेकांना समजून घेणारे, दुसऱ्याचा तितकाच आदर करणारे, एखादी अडी- अडचण असेल तर त्याला तेवढंच समजून घेणारा, त्याला जमेल तशी मदत करणारा अन तेवढंच त्याला त्याच्या आयुष्यातील त्याच्या जवळच्या माणसांसोबत त्याला मोकळीक देणाराही...

दोन मित्र : भेटले कोणत्या तरी वाटेवर.. खूप घट्ट मैत्री झाली... सतत एकत्र राहणारी.. प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष(सोशल मीडिया), खूप छान मैत्री.. प्रत्येक   कामात सतत सोबत असणारे, पण नकळतपणे ते स्वतःच्या जवळच्या माणसांना, मित्रपरिवाराला दूर करत आहेत हे त्यांच्या ध्यानातच येत नाही... घट्ट मैत्री असावी.. नक्कीच असावी.. पण त्याच सोबत आपल्या इतर मित्रांना दुखावत तर नाही ना ह्याचं भान असावं..

दोन मित्र : अगदी बालपणा पासून एकत्र शिकलेले, शालेय जीवना नंतर आपापल्या वाटेने निघून गेले.. पुढे सोशल मीडियामुळे पुन्हा एकदा जोडले गेले.. पण ते तेवढ्यापुरतच.. काही काळ गेला तरी प्रत्यक्ष भेट झाली नाही, एका कार्यक्रमा निमित्त खास ठरवून तब्बल १० वर्षांनी प्रत्यक्ष समोर आले.. अन तोच मित्र.. तोच स्वभाव...तोच हास्याचा स्फोट पुन्हां एकदा अनुभवतात... कायम लक्षात राहील असा तो दिवस... परत आपल्याला रोजच्या धावपळीत गुंतुन जातात... कधी तरी टपली मारुन पळून जावं अश्या छोट्या कालावधीसाठी भेटतात.. दूरध्वनीवरही जास्ती बोलणं होत नाही.. भेटायचे अनेक बेत कुठल्या ना कुठल्या कारणाने रद्द करावे लागतात.. पण कोणाचाच कोणावर राग नाही.. मैत्रीत तोच गोडवा लहानपणीचा...फार न भेटणारी तरी सतत सोबत करणारी...


दोन मित्र : हे सुद्धा शाळेत एकत्र शिकलेले... अन मग बऱ्याच काळानंतर संपर्कात आले.... शाळेत असताना पण विशेष काही घट्ट मैत्री नव्हती.. छान मैत्री होती... तुम्हा आम्हा सर्वांची असते तशीच.. संपर्कात आल्यावर प्रत्यक्ष भेटसुद्दा झाली नाही कधी.. तरी ह्या मित्राने आपल्या मित्राच्या छंदात त्याची मनापासून मदत केली, प्रोत्साहन दिलं...

दोन मित्र : खूप छान नातं.. काही झालं तरी एकमेकांना साथ  देणारही अन वेळ पडेल तेव्हा तेवढचं रागवेलही...असाच जराश्या कारणावरून रागवणं दुसऱ्या मित्राला दुर करणारं ठरलं.. अन टपरीवरचा कटींग चहा वाट पाहून थंड होऊ लागला...

दोन मित्र : छोट्यातली छोटी गोष्ट कधी एकदा सख्याला सांगतो अशी मैत्री...अगदी लंगडी, सापशिडी , लपंडाव पासून आयुष्यातले मोठे मोठे खेळ पेच प्रसंगांना एकत्र सामोरे गेलेले..समोर काही अचानक यावं अन करकचुन ब्रेक दाबावा तशी अचानकच तसं पहायला गेलं तर शुल्लक कारणांमुळे मैत्रीत ब्रेक लागतो... दुसरा मित्र तरीही सर्व दुर्लक्ष करून सावरायचा अनेकदा प्रयत्न करतच राहतो पण सफल होत नाही.. दुर चालेल्या मित्राची कायम वाट पाहत असतो...

दोन मित्र : टॉम ॲंड जेरी सारखे एकमेकांच्या सतत खोड्या काढणारे.. आणि तरी सुद्धा डोरेमॉन- नोबिताप्रमाणे कायम सोबत असणारे..


पाहीले असतीलच ना असे प्रसंग... असे खूप मित्र आपण पाहत असतोच.. कित्येकांशी तर फक्त काही दिवसांची ओळख असते.. तरी सुद्दा ते मदतीला धावून येतात तर काही जण अप्रत्यक्षपणे खूप काही शिकवून जातात... हा माझा खास मित्र/मैत्रीण आपण किती सहजतेने ठरवतो नाही.. पण आपले सर्वांचेच खूप जवळचे अन सर्वांत महत्वाचे मित्र त्यांचे खरंतर खूप आभार मानायला हवेत..ज्यांच्याशिवाय आपण काहीच करु शकत नाही.. ते म्हणजे आपले जवळचे मित्र...अवयव डोळे- हात - पाय...
  म्हणाल हे काय आता... पण खरचं मित्र सोबत असताना त्यांची किंमत नाही कळत.. दुर गेल्यावर त्या वाट पाहणाऱ्या थंड चहाची किंमतही अनमोल वाटतेच ना.. तसचं आहे हे.. माझी अशीच एक जवळची नसली तरी खूप काही शिकवणारी मैत्रीण.. कठीण प्रसंगानांही अगदी ' डोळसपणे' सामोरी गेली.. डगमगून गेली नाही... अनुभव आणि आनंद ह्यांच्यातले मैत्रीचे ऋणानुबंध ती अशाप्रकारे सांगते ; तिचे हे शब्द -
   ' आयुष्यात प्रत्येकजण नापास कधी ना कधीतरी होतच असतो..मग तो अनुभवातनं असेल किंवा येणाऱ्या संघर्षातून असेल; याचा अर्थ आपण थांबायचं असा होत नाही...डोळे बंद झाले म्हणून आमची आयुष्यं थांबली नाहीत, ती चालूच राहीली...एक अवयव बंद झाला तर दुसरे उभे राहतात तुमच्या पाठीशी...
        हारणं हा एक अनुभव असतो..आणि जिंकणं हा आनंदाचा भाग असतो..आणि आनंदापेक्षा अनुभव नेहमीच मोठाच असतो..- अनघा मोडक

तर असच आनंदासोबत जगताना आपल्या अनुभवांनाही नेहमीच गाठीशी ठेवा... क्षणिक आनंदासाठी अनुभवांना दुर करु नका.. मित्र हे मित्रच असतात.. कधी त्यांनी आपल्याला समजून घ्यावं तर कधी आपण त्यांना...कोणी असाच मित्र लांब गेला असेल तर आज नक्कीच आठवला असेल.. मोठ्या मनाने निदान आजच्या शुभेच्छा देऊन पुन्हां एकदा मैत्रीचा हात पुढे करा..न भेटणाऱ्या मैत्रीला नव्याने भेटुया..बघा त्या थंड झालेल्या चहाची किंमत अनमोल वाटेल..आणि आनंद - अनुभव ह्यांच्यातल्या मैत्रीची किंमत कळेल...

तुमच्या ह्या मैत्रीणी कडून काही चुका झाल्या असल्यास माफ करा..ह्यामधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही... तरी अनावधानाने तसं झाल्यास क्षमस्व... आणि माझ्या सर्व मित्र- मैत्रीणींना माझी नेहमीच साथ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद....
आपल्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत.. धन्यवाद
- ©नंदिनी हाटकर..


PC : Google


----------------------------------------------------------------------------

'कला' हे  एक असं माध्यम आहे जे तुम्हाला व्यक्त व्हायला  मदत करते, आता पर्यंत तुम्ही माझ्या लिखाणाला दाद दिली व पुढेही द्याल अशी अपेक्षा करते, तुम्हा सर्वांचे धन्यवाद🙏

अशीच एक कला मी व माझी बहीण सादर करु इच्छितो  त्यालाही तुम्ही उत्तम दाद द्याल अशी अपेक्षा करते.

कागदाच्या कलाकृती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अन पुन्हा माणूसकी भेटली.

सरतय वर्ष... काही तरी राहून जातय...