अन पुन्हा माणूसकी भेटली.
लहानपणापासून शिकत आलो माणूसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे.. प्रत्येकाने दुसऱ्याशी चांगलेच वागावे.. फार नाही तर निदान आपल्याला जमेल तेवढी मदत गरजूला करावी. कोणाला फसवू नये. तरी कधीकधी लोकांचा मानवतेवरचा विश्वास काहीप्रमाणात कमी होताना दिसत असला तरी संपलेला नाही. काळ बदलत गेला तसा मानवाचे रंग बदलत गेले. स्वतःच्या स्वार्थासाठी मानवाला नाती, माणूसकी ह्या सर्व गोष्टी नगण्य वाटू लागल्या. काही प्रमाणात स्वार्थ हा सर्वात मोठा ठरताना दिसतो. आजचा काळ तर ह्या सर्वाची प्रचिती देणारा असला तरी माणुसकी पूर्णतः नष्ट झाली असं म्हणता येणार नाही. आजच घडलेला अनुभव...
११ ची वेळ..(अर्थात सद्यस्थितीत रेल्वेच्या नियमावलीनुसार) सकाळी कामावर जाताना मुंबईकर जसा नेहमी घाईतच असतो; तशी मीही काहीशी घाईतच होते.. ट्रेन मध्ये चढतानाचा अलिखित नियम मुंबईकरांना सवयीचाच आहे. तो म्हणजे स्वतःला आणि सोबतच्या सामानाला नीट सांभाळायचं. आपली बॅग पुढे पकडूनच ट्रेनमध्ये चढायचं.. रेल्वे स्थानकात होणाऱ्या चोऱ्या काही मुंबईकरांसाठी नवीन नाही.. म्हणूनच मीही स्थानकात पोहोचल्यावर सवयीने बॅग पुढे घेतली..पूलावरून उतरले तेव्हा ट्रेन नुकतीच थांबत होती. ट्रेन सुटण्याच्या आत चढायला हवं म्हणून थोडी धावले..अन महिलांसाठीच्या राखीव विभागात चढले..कोरोनामुळे नियमावली असली तरी सध्या ११च्या दरम्यान पूर्वीसारखीच गर्दी हळूहळू वाढत चालली आहे.. तेव्हा मी चढून दाराजवळच होते. मी आणि मागची एक बाई पुढच्यांना थोडे आत सरकायला सांगत होतो.. तेवढ्यात मागून एक आवाज आला. एक माणूस प्लॅटफॉर्मवर उभा राहून आवाज देत होता. - आत्ता कोण धावत चढलं तुमच्यापैकी? हे पाकीट आत्ताच खाली पडलं तुमच्यापैकी कोणाचं आहे का? आम्ही मागे पाहिलं.
अन बघते तर काय... त्याच्या हातात माझंच छोटंसं पाकीट होतं. मी पटकन हो माझंच आहे सांगितले अन त्याने ते पटकन माझ्या कडे सुपूर्द केलं. त्याला धन्यवाद म्हणता म्हणता ट्रेन सुटलीही.... आपली अचानक कोणाला तरी मदत झाली ह्याचं समाधान पाकिट हातात देताना त्याच्या डोळ्यात पटकन जाणवलं...
झालं असं होतं तर बॅगेच्या पुढच्या कप्प्याची चेन अचानक उघडली होती..अन माझ्या नकळत ते पाकीट खाली पडल्याचं माझ्या लक्षातही आलं नव्हतं.. मनोमन त्या माणसाचे आणि देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानले. अन आज पासून ते पाकीट बाहेरच्या कप्प्यात कधीच ठेवायचे नाही असं ठरवून टाकलं...
आजूबाजूच्या बायकाही बोलू लागल्या बरं झालं लगेच त्यांनी दिलं.. हो ना, मी म्हणाले. मला तर कळलंही नाही चेन कशी उघडली आणि पाकीट खाली कधी पडलं...विचार करू लागले.. बापरे खरचं हरवलं असतं अन चुकीच्या माणसाच्या हाती लागलं असतं तर... खरंच त्या माणसाचे उपकार झाले... त्यात फार पैसे नव्हतेच म्हणा.. दोन चार नाणी, एक दोन कानातले, नुकताच नवीन घेतलेला इअरफोन तर होताच.. पण महत्त्वाचे म्हणजे रेल्वेचा पास आणि पॅन कार्ड ह्या दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आज त्या माणसामुळे मला परत मिळाल्या...
खरचं माणूसकी आजही जिवंत आहे ह्याची प्रचिती पुन्हां एकदा आली.. आजचा काळ थोडा प्रत्येकाच्या आयुष्यात आर्थिक अडचणींचा असला तरी लोकांची मति फिरवू शकला नाही.. दुसऱ्यांना निस्वार्थीपणे कायम मदत करा..आपल्यालाही कधी ना कधी मदत मिळतेच.. हे बऱ्याचदा ऐकलं तर होतंच.. तशी मलाही कित्येकदा मिळालीच.. पण आज पुन्हां एकदा अनुभवलंही.... मुंबई नेहमीच सर्वांना मदत करते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. त्या माणसाचे मनापासून पुन्हां एकदा खूप खूप आभार.. त्या काही क्षणात त्यांचे नीट आभार मानता आले नाही.. म्हणून हा अनुभव ह्या माझ्या शिदोरीत मांडला... आशा आहे त्या माणसापर्यंत हे लिखाण पोहोचावं अन त्या सोबत माझे मनपासून आभारही.. हे कितपत शक्य होईल माहीत नाही.. पण मुंबईने मला कायमच मदत केली आहे.. तेव्हा त्या एकाचे प्रातिनिधिक म्हणून 'मुंबई' तुझे पुन्हां खूप खूप आभार....
धन्यवाद.
- नंदिनी हाटकर.

छान अनुभव,नंदिनी,!लिहिलंयसही छान!
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद ज्योतीजी..
Deleteखुपचं छान लिहिलेस... अशीच लिहित रहा..
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद निसर्गा..
Deletevery nice.. keep it up.. not pocket but writing skills.. 🙂
ReplyDeleteThank you so much..
DeleteKhoop Chaan lehala aahe....ashich day to day life madhil ghatana lihat ja....sarva ekdum mast aani Sundar lihala aahe.....All the very best to you....
ReplyDelete