बस...भीती...अन आईचं नेटवर्क...




नमस्कार, बऱ्याच दिवसांनी काही लिहायचा हा छोटासा प्रयत्न... निमित्त होतं ते 'भटकंती महाराष्ट्राची' ने मातृदिन विशेष आयोजित केलेल्या स्पर्धेचं.... स्पर्धा अशी की ' आपल्या आईसोबतची भटकंती/प्रवासाविषयी असलेली आठवण लेखनस्वरूपात पाठवायची' होती... अन आदल्या दिवशी रात्री हे लिखाण केले.. खरंतर झोपेत असल्याने काही चूका असल्यास क्षमस्व.... स्पर्धेसाठी आईसोबतची आठवण हा महत्वाचा मुद्दा असल्याने हा ५ दिवसांचा अनुभव थोडक्यात मांडला आहे... पूर्ण अनुभव मागे लिहिता लिहिता अर्धवट राहून गेला होता पण स्पर्धेनिमित्त का होईना थोडक्यात लिहिता आलं त्यासाठी अन मला ह्या स्पर्धेत  सहविजेती ठरवलं त्यासाठी 'भटकंती महाराष्ट्राची' टीमचे खूप खूप आभार... तर नक्की वाचा... आपल्या सूचना अन प्रतिक्रिया सर्व स्विकारल्या जातील...
धन्यवाद.🙏🙏


बस...भीती...अन आईचं नेटवर्क...

भटकंती... फिरणं... हे काय असतं... हे जेव्हा आपल्याला समजतही नसतं तेव्हापासूनच खरंतर आपल्या फिरण्याची सुरुवात झालेली असतेच...आणि तीही आपल्या आईमुळेच... हो खरं आहे.. विचार करून बघा..तान्हुल्या जीवाचं पोषण-रक्षण करताना आपल्या आईचं संपूर्ण लक्ष स्वतःकडे कमी अन आपल्याकडेच लागलेलं असतं आपल्या तान्हुल्याच्या प्रत्येक अवयवाची वाढ, गती व्यवस्थित होत आहे ना हे कुटूंबामध्ये फक्त आईच जास्ती बघत असते.. आपल्या सुरक्षेसाठी किती अन काय काय करत असते हे मी वेगळं सांगायला नकोच.. तर आजच्या ह्या मातृदिनी जगभरातल्या सर्वच माऊलींना कोटी कोटी प्रणाम अन खूप खूप खूप शुभेच्छा....
    लहानपणी आपल्याला शाळेत निबंधासाठी माझी शाळा, मित्र आणि माझी आई असे विषय असायचे नाही? त्या बालबुद्धिला जमेल उमजेल तसे आपण तेव्हा ते लिहिलेही असतील... आजच्या ह्या मातृदिनी आई सोबतचा प्रवास मांडायचं म्हटलं तर काय अन कुठून सांगू ठरवता येत नाही...तरी हा छोटासा प्रयत्न....

भटकंती असो वा एखादा छोटासा प्रवास... आईसोबत केलेली बाजारहाटातली साधीशी सफरही नेहमीच छान असते कारण आपल्या सर्वात जवळची अशी तीच असते... आईलाही बऱ्यापैकी फिरण्याची आवड असल्यामुळे तिने नोकरी, घर अन आम्हाला सांभाळत जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा फिरायला घेऊन गेली... मैत्रिणींसोबत ठरवलेल्या सहलींमध्ये आम्हा बच्चेकंपनींची तर मज्जाच असायची कारण शाळेव्यतिरिक्त सहलीला जायची संधी सहजपणे आम्हाला मिळायची... त्यावेळी केलेली भटकंती, प्रवास काही ना काही कारणांमुळे नेहमीच लक्षात राहतीलच...पण काही प्रवास खरंच अविस्मरणीय ठरतात... आणि खूप काही अनपेक्षित असे अनुभव देऊन जातात...त्यातून शिकण्यासारखं असतं...

असाच एक काही काळ थक्क करून सोडणारा अनुभव त्यावेळी बस मध्ये असणाऱ्या आमच्यापैकी कोणालाही कधीच विसरता येणार नाही...
'आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ प्रकल्प' ह्याठिकाणी आयुष्यात किमान एकदा तरी जाऊन भेट देण्याची इच्छा जगातल्या प्रत्येकालाच असते... तर ही संधी आम्हाला 'भटकंती महाराष्ट्राची'मुळे आम्हाला मिळाली...आणि मी माझ्या आई बहीणींसोबत भटकंतीच्या चमूसोबत ३ मार्च २०१७ ला रात्री नागपूरकडे रवाना झालो.. सकाळी ७ वाजता नागपूर स्थानका जवळून बस ने मग आनंदवन कडे आमचा चमू निघाला...माणूसकीच्या पंढरीत म्हणजे आनंदवनमध्ये आम्ही दुपारी पोहोचलो... शब्दांत सांगता नाही येणार असं आनंदवन.. प्रत्येकाने ह्या पंढरीत किमान एकदा तरी जावचं... बाबा आमटे - साधनाताई आमटे ह्यांना कोटी कोटी प्रणाम...
    तिथे एक रात्र वास्तव्य करून मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आम्ही हेमलकसा कडे प्रस्थान केले... तिथे पोहोचल्यावरही कर नकळतपणे जोडले गेले असे त्यांचे कार्य... प्रकाश आमटे अन मंदाकीनी आमटे ह्यांच्या अगाध प्रयत्नांनी उभा असलेला लोकबिरादरी प्रकल्प आणि त्यामुळे दुर्लक्षित समाजघटकांना सामान्यांप्रमाणेच समाधानाचा श्वास घ्यायला शिकवणारे प्रकाश आमटे आणि मंदाकीनी आमटे ह्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी हितगुज करून आम्ही खूप धन्य झालो... देवदूतांशी भेट झाल्याची ती अनुभूती होती... तिथे ही आलेल्या प्रत्येकाची राहण्याची जेवणाची सोय आनंदवन प्रमाणेच कौतुक करण्यासारखीच होती...आनंदवन अन हेमलकसाला भेट देऊन भटकंतीचा संपूर्ण चमू प्रभावित झाला होता.... त्यावर थोडे चर्चा करून पहाटे ३ ला निघायचं ठरवून आम्ही रात्री झोपायला गेलो...कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला हेमलकसा वरुन तब्बल ६ तासांचा प्रवास करून सोमनाथ प्रकल्पाला भेट द्यायची होती.. अन त्यानंतर जवळपास तेवढाच प्रवास करून नागपूर स्थानक गाठायचे होते कारण रात्री ८:४० ची ट्रेन पकडायची होती..
 ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व पहाटे ३ ला बसजवळ पोहोचलो... गणपती बाप्पा मोरया म्हणत ३:१५ ला आम्ही सोमनाथकडे जायला निघालो... अन.... म्हणतात ना आयुष्यात काही गोष्टी अचानकपणे थक्क करून सोडतात... पण आपण त्यातून न डगमगता पुढचा मार्ग शोधायचा असतो असाच काहीसा हा प्रसंग...
 काही अंतर पुढे गेल्यावर पहाटे ३:४० वाजता आमची बस बंद पडली... क्षणभर काहीच कळलं नाही... पण ४-५  मिनिट झाले अन काही केल्या बस चालू होत नव्हती.. अन निघाल्यावर बस मध्ये आमच्या सर्वांच्या चालू असलेल्या चिवचिवटाचं रूप क्षणात भयाण शांततेत झालं...गडचिरोलीतल्या जंगल परिसरात आम्ही बंद पडलेल्या बस मध्ये कोणाशीच न बोलता बसलो होतो... रस्त्यावर दिवे नाहीत.. अन त्या जंगलातून एवढ्या पहाटे कोणती गाडी जाणं शक्यच नाही गडचिरोलीत घडणाऱ्या गोष्टी ऐकून होते सर्वच; त्यामुळे सर्वच थोडेफार घाबरलेले होते अन थोडा देवाचा धावाही मनोमन सुरू झाला होता..झालं असं होतं की ईंधन किती शिल्लक आहे हे दाखवणारं यंत्रच बिघडलं होतं अन त्यामुळे ईंधन संपलय हे चालकाच्या लक्षात आलं नाही... खरंतर दोन दिवस गाडी चालवत असूनही ही गोष्ट त्याच्या कडून दुर्लक्षित झाली हेच नवल होतं पण ती वेळ त्याला ह्याबाबत ऐकवण्याची नव्हती तर मार्ग शोधण्याची होती... त्यात त्याभागात कोणाच्याच फोनला नेटवर्क नाही हे माहीत असूनही सर्वजण फोनला नेटवर्क आहे का हे तपासत होते.. चालक त्याच्या फोन वरून हेमलकसा मध्ये दुपारी आलेल्या बस चालकाला फोन करायचा प्रयत्न करत होता पण व्यर्थ... काय करावं कळत नव्हतं.. तितक्यात आईने तिचा जुना फोन ( जो आम्ही कशाला उगाच दोन फोन न्यायचे एक ठेव घरी असं म्हणत होतो तरी तिने उपयोगी आलाच तर म्हणून घेतला होता) काढून पाहिलं तर पूर्ण नेटवर्क... MTNL(BSNL) जिंदाबाद म्हणत सर्वच खुष झाले.. हेमलकसा मध्ये सेवा करण्यासाठी वास्तव्य करणाऱ्या यतिशचा नंबरही आईने केव्हा घेतला होता आम्हाला माहीतही नव्हते.. लगेच यतिश ला संपर्क केला अन आमचं दैव बलवत्तर म्हणून  संपर्क झालाही अन दुसरी बस घेऊन यतिश आमच्या पर्यंत काही काळानंतर आलाही...यतिशचेही खूप आभार... पण तरी ती बस येई पर्यंतचा आमचा त्या अंधाऱ्या रस्त्यावरचा तो थोडासा काळही भीतीने पोटात गोळा आणणारा होता.. तेवढा वेळ कोणीच कोणाशी बोलत नव्हतं... जशी ती बस आली तसा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.. अन सर्वांनी पुन्हां आईचे खूप आभार मानले...त्या बस मध्ये बसून आम्ही पुन्हा लोकबिरादरी प्रकल्पात गेलो अन तिथे तिसऱ्याच बस मध्ये आमचं सामान चढवलं अन लगेचच सोमनाथ कडे निघालो... 
     दुपारी सोमनाथ ला पोहोचल्यावर तो संपूर्ण प्रकल्प पाहीला.. विकास आमटेंनी ज्या प्रकारे पाण्यासाठी प्रकल्प बांधला आहे ते खरोखरच कौतुकास्पदच आहे... ह्या प्रकल्पामुळेच आनंदवन हेमलकसा अन आसपासच्या परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवत नाही... जिथे आज मुंबईसारख्या प्रगत शहरातही पाण्याचा अभाव बऱ्याच ठिकाणी असतो त्याच वेळी तिथे त्यांना १२ महिने मुबलक प्रमाणात पाणी मिळतं....खरोखर विकास आमटेंना अन त्यांची साथ देणाऱ्या प्रत्येकाला सलाम.. हे सर्व पाहून गहिवरून गेलो होतो... इथे येताना असलेल्या माहितीपेक्षाही खूप काही आम्ही आमच्या शिदोरीत सोबत आणणार होतो... दुपारचे जेवण  तिथेच करून बसने आम्ही लगबगीने नागपूरच्या दिशेने निघालो.... आता वेध होते ते ट्रेन चे... वेळेवर पोहोचू का ह्याचे... पण आता कोणत्याही अडथळ्याशिवाय आम्ही वेळेत नागपूर स्थानकात पोहोचलो अन मुंबईकडे आमची स्वारी निघाली....
खूप काही शिकलो ह्या प्रवासात... आमटे कुटुंबाकडून तर खूप शिकण्यासारखं आहेच... पण पहाटे घडलेल्या त्या प्रसंगाने एवढं नक्कीच शिकलो कुठेही जाताना गाडी प्रत्येकवेळी तपासून घ्यायची.. अन जुना असला तरी न जाणे कधी कामात येईल म्हणून तरी दुसऱ्या नेटवर्कचा फोन सोबत असावाच...आईच्या ऋणात तर आपण असतोच आणि असावचं पण त्यावेळी आईच्या नेटवर्कमुळे आम्ही त्यातून मार्ग काढू शकलो.. त्यासाठी तिचे आभार मानावे तेवढेच कमी...म्हणतात ना देवाला प्रत्येक ठिकाणी हजर राहता येणार नाही म्हणून त्याने आईच्या रूपात रहायचं ठरवलं.. अन देव तारी त्याला कोण मारी... तसचं आमच्या सोबत आई होती म्हणून आम्ही त्या संकटातून तरलो...त्यासाठी आईचे खूप खूप आभार...आईसोबतचा हा प्रवास कायमच लक्षात राहील... आईसोबत अजूनही बऱ्याच ठिकाणी फिरण्याची आमची  इच्छा आहे...पुन्हां एकदा आईला अन जगातल्या सर्व माऊलींना मातृदिनाच्या खूप शुभेच्छा... तुमचा आशीर्वाद असाच कायम आमच्या पाठीशी असूदे हेच मागणे....
धन्यवाद.
- नंदिनी हाटकर.

----------------------------------------------------------------------------------------

'कला' हे  एक असं माध्यम आहे जे तुम्हाला व्यक्त व्हायला  मदत करते, आता पर्यंत तुम्ही माझ्या लिखाणाला दाद दिली व पुढेही द्याल अशी अपेक्षा करते, तुम्हा सर्वांचे धन्यवाद🙏

अशीच एक कला मी व माझी बहीण सादर करु इच्छितो  त्यालाही तुम्ही उत्तम दाद द्याल अशी अपेक्षा करते.

कागदाच्या कलाकृती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Comments

  1. खूप सुंदर लिखाण नंदिनी 👏👏👌

    ReplyDelete
  2. सुंदर अनुभव आणि छान वर्णन. मलापण या प्रवासात तुमच्याबरोबर बस मधून प्रवास केल्या सारखे वाटले.
    डॉ. आमटे कुटुंबियांना सलाम.

    ReplyDelete
  3. सगळे डोळ्यासमोर उभे राहिले

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

न भेटणारी मैत्री.....

अन पुन्हा माणूसकी भेटली.

सरतय वर्ष... काही तरी राहून जातय...