निरुत्तर....

काय बोलू शब्दच नव्हते...
तेव्हा मनात आणि डोळ्यांत अश्रूंशिवाय उत्तर नव्हते...

वाटलं नव्हतं दिवाळी अशीही साजरी होईल...
पाऊल टाकताच उठून बसले.. 
थकलेले पण तेवढेच आतूर डोळे...
शुभ दीपावली म्हणून थरथरत्या हातांनी मिळालेला आशीर्वाद;
खूप काही सांगत होता.. 
चेहऱ्यावरचा आनंद जणू रक्ताचं नातं शोधत होता.... 

काय बोलू शब्दच नव्हते...
तेव्हा मनात आणि डोळ्यांत अश्रूंशिवाय उत्तर नव्हते...

काय माहीत दिवाळी ते किती वर्षांनी साजरी करत होते..
केक कापताना ऐकू आला एक भाबडा आवाज...
आजोबांनी प्रश्न केला...'मला पण केक मिळणार ना ?'.................................

काय बोलू शब्दच नव्हते...
तेव्हा मनात आणि डोळ्यांत अश्रूंशिवाय उत्तर नव्हते...

गप्पागोष्टी झाल्या...मनातील अश्रू शब्दांमार्फत वाहत होते....
त्यांचे डोळे मुलं आणि नातवंडे यांच्यासाठी आसुसले होते....
काळजी घ्या, परत नक्की या... 
अनामिक नात्याच्या हक्काने ते पुन्हां पुन्हां सांगत होते.....

'उभी का तू , बस ना इथे' आजोबा म्हणाले....
सहज म्हणाले मी, आजोबा तुम्ही खरचं आरामात बसा..काहीच हरकत नाही...
नंतरचे आजोबांचे शब्द अजूनही मनातून जात नाही....
आजोबा म्हणाले-.....
' का गं ? आमची लाज वाटते का ?'
..............................................................

काय बोलू शब्दच नव्हते...
तेव्हा मनात आणि डोळ्यांत अश्रूंशिवाय उत्तर नव्हते...

हे चित्र आपल्या आसपास असणाऱ्या अनेक वृद्धाश्रमात आणि घरी एकटेच आपल्या माणसांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या वृद्धांचे आहे....
का अशी वेळ त्यांच्यावर येते...
आजोबांचा प्रश्न निरुत्तर करणारा असला तरी विचार करायला लावणारा आहे.......
ज्या वयात मुलांचाच आधार हवा तेव्हाच रुसलेल्या मुलापासून दुरावलेल्या आईची व्यथा -
कवियत्री अनुराधा पोतदार ह्यांच्या पुन्हां एकदा वाचनात आलेल्या छोट्याश्या पण खूप मोठा आशय असणाऱ्या कवितेने पुन्हां जाणवलं...
एक अशीही जाणीव प्रत्येकाला असलीच पाहिजे..

     अजूनही सारं सोपं होईल...- अनुराधा पोतदार

" इवल्याश्या कानांत फुंकर घालून, काजळतीट करून,
           तुम्हाला पाळण्यात जोजवीत होते,
   तेव्हा हुंगलेल्या त्या मऊ जावळाचा ओला गंध
                 मला आजही आठवतो.
       - तुमच्या ओढीनं घराकडे धाव घेताना,
           तटतटलेल्या स्तनांना धारा फुटत :
                   पदर भिजून जाई.
तुमचं बाळमुख झाकणाऱ्या त्या दूधभिजल्या पदराचा गंध
                 तुम्हांला आज आठवेल,
             तर अजूनही सारं सोपं होईल.."
                   - अनुराधा पोतदार


Picture Courtesy : Pixabay



वृद्धाश्रमातच नाही तर स्वतःच्या घरात असुनही एकटे जगणाऱ्या, स्वतःच्याच लेकरांकडून डावलले जाणाऱ्या, छोट्याश्या कारणाने रुसुन धरलेला अबोला सहन होत नसतानाही आपलचं लेकरू आहे फार काळ लांब राहू शकणार नाही (या चिमण्यांनो... परत फिरा रे घरा कडे अपुल्या...) अशी कुठे तरी भाबडी आशा बाळगून त्यांच्या वाटेकडे आस लावून बसलेल्या सर्व आई- वडिलांची , आजी- आजोबांची कथा...
आपलेच पालक आहेत, त्यांच्यामुळेच आपण आहोत, हे जग पाहतो आहे , ह्याचा विसर पडण्यापूर्वी
सदा त्यांच्या वागण्या- बोलण्याचा, सुचनांचा, आदेशांचा  चुकीचा अर्थ काढून एखादा निष्कर्ष काढण्यापूर्वी...
त्यांनी लेकरांसाठी केलेले कष्ट, लेकरांसाठी स्वतःचे मोडलेले स्वप्न, स्वतःकडे केलेले दुर्लक्ष ( अर्थात स्वतःकडे दुर्लक्ष करणे किंवा होत जाणे हे चुकीचेच आहे... पण कित्येकदा ह्याला परिस्थितीच कारणीभूत असते ) सदा लक्षात असुद्या.....याची परतफेड कोणीच करू शकत नाही......  चुकत असेल त्यांचेही; पण इतकी वर्षे आपल्या चूका पोटात घेणारेही, मुलांच्या आवडीसाठी स्वतःची आवड बाजूला ठेवणारेही तेच आहेत ना...
एवढं होऊनही स्वतःच्याच लेकराचा दिवसरात्र विचार करत राहणं, रात्ररात्र झोप लागत नाही म्हणून पुन्हां लेकरांचाच विचार करत राहणं, आपलं लेकरु गैरसमज करून घेत स्वतःवर चिडचिड करून घेतं, स्वतःकडे दुर्लक्ष करतयं ह्यासाठी काय करावं, कुठे चुकतोय ह्या विवंचनेत जगणं ह्याचा त्यांनाच जास्ती होणारा त्रास ह्याचा निदान १% तरी विचार करा...
छोट्याश्या कारणाने अबोला धरण्याआधी तेही कित्येकदा आपल्यावर रागवले असतानाही आजवर त्यांनी कधीच लेकरांशी अबोला धरला नाही ह्याचा लेकरांनीही विचार करा....
आठवून पहा...

बघा अजूनही सारं सोपं होईल.....


- ©नंदिनी हाटकर..



----------------------------------------------------------------------------

'कला' हे  एक असं माध्यम आहे जे तुम्हाला व्यक्त व्हायला  मदत करते, आता पर्यंत तुम्ही माझ्या लिखाणाला दाद दिली व पुढेही द्याल अशी अपेक्षा करते, तुम्हा सर्वांचे धन्यवाद🙏

अशीच एक कला मी व माझी बहीण सादर करु इच्छितो  त्यालाही तुम्ही उत्तम दाद द्याल अशी अपेक्षा करते.

कागदाच्या कलाकृती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.





Comments

  1. खरच. माझ्या डोळ्यात पाणी आले. कित्ती संवेदनशील पणे तुम्ही लिहिले आहे. सॉलिड.
    खुप खुप आवडला हा ब्लॉग मला.

    ReplyDelete
  2. खूपच छान लिहिले आहे.
    Very touching & absolutely true.

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर लिहिलंय..डोळ्यात अश्रू तरळले😢

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

न भेटणारी मैत्री.....

अन पुन्हा माणूसकी भेटली.

सरतय वर्ष... काही तरी राहून जातय...