रत्नांसोबतचा.... रतनगड

          नमस्कार.. खूप दिवसांनी लिहिते आहे, खरतर तसं खूप आधी पासूनच लिहित होते... पण बरचं काही अर्ध्यावर राहून गेलय...असो आता पुन्हा प्रयत्न... उशीर नाही म्हणणार कारण उशीर कधीच नसतोच; नव्याने सुरुवात असते... तर ह्या नव्या प्रयत्नाचं कारणही तसचं आहे... 
         
          दररोजच्या धावपळीच्या जगण्यातून काही काळ बाहेर पडून मोकळा श्वास घेणं कोणाला नाही आवडत... प्रकृतीचं अफाट सौंदर्य, इतक्या वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या गड - किल्यांवर भटकंती करताना काही काळ का होईना निसर्गाच्या सानिध्यात रहायला मिळणं हि खरेतर आजच्या प्रदूषणयुक्त जीवनातली गरज वाटते (तसं मी 'निसर्गा'च्या सानिध्यात नेहमीच असते....😀)
       
          म्हणूनच जमेल त्या त्या वेळी अशा भटकंती साठी माझ्या बहिणींसोबत निघते... आत्तापर्यंत अशी भटकंती केलेल्या सर्व गडांमध्ये सुंदर असं रत्नच आहे रतनगड... भंडारदरा परिसरात असलेला आणि प्रवरा नदीचं उगमस्थान असलेला रतनगड सर्व भटक्यांना प्रेरणा देणारा आहे...ह्या बद्दल वाचलं होतं ऐकलं होतं..' भटकंती महाराष्ट्राची' या गटाने जून मध्ये ही रतनगड - ट्रेक आयोजित केला होता.. पण त्या वेळी जाण्याचा योग नव्हता बहुतेक; तेव्हाचे फोटो पाहून , ब्लॉग वाचून आपल्यालाही हा अनुभव घेता आला असता असं वाटलं खरं पण खंत कधीच नव्हती कारण पुन्हां कधी तरी जाता येइलचं हे नेहमी मनाशी पक्क असतं त्यामुळे ह्यावेळी जायचचं असा कधीच अट्टाहास नसतो आणि झालं ही तसचं पुन्हां एकदा रतनगडला जायची संधी 'भटकंती महाराष्ट्राची ' मुळे मिळाली...हा 'रतनगड-फ्लॉवर्स स्पेशल ट्रेक' होता...मी आणि निसर्गा (माझी जुळी बहीण) आम्ही जाता येईल का बाकी काही महत्वाची कामं नाही ना...इत्यादी बघून शुक्रवारी ठरवलं - चलो ह्यावेळी सर्व जुळून येत आहे तर जाऊया...

        आणि आम्ही ठरल्याप्रमाणे शनिवारी , १६ सप्टेंबरला रात्री 10:30 ला अंधेरीला भेटलो.. ट्रेन मधून अंधेरीला उतरतोच तो पाऊस दत्त म्हणून उभा राहिला, खरा प्रवास सुरू होण्याआधीच केवळ ५  मिनिटांच्या अंतरासाठी रेनकोट काढावा लागला म्हणून पावसाचा जरासा राग आला (हल्ली पाऊस पडला काय किंवा नाही पडला तरी सोयीनुसार आपणा मनुष्यप्राण्याला राग येतो नाही का?) तर दुसरीकडे ' हरिहर' ट्रेक ची आठवणही आली तेव्हाही असा सुरुवातीपासून पाऊस सोबत होता.. हळूहळू करून एकेक जण आले आणि ११:३० च्या सुमारास आमच्या प्रवासाचा श्रीगणेशा झाला.. पुढें आणखी काही जण चढले... पाऊसही एव्हाना थांबला होता... तर रतनगड ला जाणारी आम्ही सर्व एकूण २४रत्ने होतो...ह्याचा  सुरुवातीपासूनच अनुभव येऊ लागला... (तसं तर एक रत्नं माझ्यासोबत नेहमीच असतं)  कुठल्याही कामाची सुरुवात श्रीगणेशा करून करतात तसच ह्या रत्नांचा उजेड पाडण्याची सुरुवात ' गणेश' नेच  केली... त्याच्या मते तो एकाशी फोनवर बोलला आणि ती व्यक्ती सर्व आले तरी आली कशी नाही ह्यावर तो बराच वेळ गोंधळात होता... खरी काय फजिती झाली हे फक्त बस मध्ये जे होते त्यांनाच माहित (एवढच सांगेन ' ती' व्यक्ती काही शेवट पर्यंत आली नाही...). सर्व जण आल्यावर सागर, विपुल, गणेश आणि गौरवने  (जे ह्या वेळी सत्या आणि भूषण नसल्याने आमचे लीडर होते )थोडक्यात सर्वांची ओळख करून घेतली आणि मग कोणालाही झोपू न देता अंताक्षरी चालू केली खूप धमाल चालू होती कारण कोणत्याही गाण्याची फक्त सुरुवातच येत होती बाकी पुढे काय वाट्टेल ते गाणं रचत होते; असचं गाणं येत नसताना सुरुवातीच्या शब्दाला जोरात सुर लावून गाणं सुरु करणारं रत्न म्हणजे अस्मिता... एकाही गाण्याला सुर चुकवला नाही.... त्यामुळे अंताक्षरीत वेगवेगळ्या सुरांची मिसळ होत होती.. असलेली नसलेली गाणीच काय तर एकच अक्षर सारखं येत असल्याने विपुलने शेवटी  आरत्या म्हणायलाही सुरुवात केली...
         
           नंतर ३च्या सुमारास आम्ही घोटी गावात पोहोचलो, तिथे जरा थांबून (अर्थात बाकीच्यांनी) चहा घेतला;  अन लगेचच पुढच्या प्रवासाला  मार्गस्थ झालो.... आता पुन्हां गाणी चालू झाली न मग काही वेळाने हळूहळू सर्वच जण पांगू लागले... पण आधी कोणी गाण्यांसाठी झोपू देत नव्हतं आणि आता सुंदर खड्डेमय रस्ते झोपू देत नव्हते.... पुढचा मार्ग बंद असल्याने आम्हाला दुसऱ्या मार्गाने जावं लागलं आणि तिथेही असेच 'सुंदर' रस्ते होडीत बसल्याचा 'आनंद' देत होते.  रतनगड कडे जाणाऱ्या मार्गाचा प्रवेशद्वार आला तशी थोडावेळ लागलेल्या झोपेतून जाग आली तेव्हा आसपासचा परिसर पाहून मन प्रसन्न झालं डोंगररांगा , नदी हिरवागार निसर्ग पाहून रतनवाडीला पोहोचण्याआधीच ताजेतवाने झाल्यासारखे वाटले...५:३० पर्यंत रतनवाडी गावात पोहोचणं अपेक्षित असताना आम्ही ७:३० ला म्हणजेच दोन तास उशीरा पोहोचलो; म्हणून ही वाट खरोखरच दूर जातेय असं वाटलं. मग चहा नाश्ता घेऊन ओळखपरेड झाली आणि जवळच गडाच्या पायथ्याशी असलेल्या हजारो वर्षांचा इतिहास सांगणारं श्रीमहादेवाचं प्राचीन 'अमृतेश्वर' मंदीर आणि सुरेख असा तलाव पाहून ८:३० ला आमच्या भटकंती चा श्रीगणेशा झाला...


 



          ठरल्याप्रमाणे लीडर सोबत राहून, नवीनच झालेल्या मैत्री ची ओळख करून घेत, निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवून घेत; फोटो काढत , प्रवरा नदी आणि तिथे बांधलेले बंधारे पाहत, पायवाटेने पुढे पुढे जात होतो... पण मुंबईतून निघताना हजेरी लावून गेलेला पाऊस कुठे लुप्त झाला होता काय माहीत, सूर्यदेव जरा जास्तीच प्रसन्न होत होते..तरी 'सोनकी' नामक छोटीशी पिवळी फुले मनाला शांतता देत होती... नजर जाईल तिथे सर्वत्र पिवळ्या फुलांचा सडा दिसत होता;  खालून डोंगररांगा जणू पिवळ्या रंगाची शाल पांघरल्यासारख्या दिसत होत्या... तर दुसरी कडे सुरुवातीला आलेली हरिहर गडाची आठवण बाजूला सारून सूर्यदेवांच्या कृपेने मला पुन्हा ' टिकोना ' गडावर नेलं होतं कारण पुन्हां '' तो नव्हताच...''  ( टिकोनाचा माझा अनुभव )
 
   

             काही जण नवीन असल्याने , पहिल्यांदाच आले असल्याने मागे राहत होते (त्यामुळे आमच्यातील एक रत्नं कोणाला त्रास होतोय बघू तिला मी चॉकलेट देतो आणि भराभर वर आणतो म्हणत मागे गेला आणि सर्वांना घेऊन थोड्या वेळाने आला) पण त्यामूळे आम्ही पुढे असलेले ते येइपर्यंत खूप सारे फोटो काढत होतो , एवढ्या तप्त उन्हातही रतनगड आणि आसपासचा परिसर, हिरव्यागार डोंगररांगा पाहून गारवा जाणवत होता....पुढे  घनदाट जंगलातून  जाणाऱ्या पायवाटा , विविध प्रकारची झाडं , फुले आणि त्यांवर फिरणारे भ्रमर, वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट, मधूनच डोंगररांगांमधून वाहत आलेल्या पाण्याच्या ओहोळाचा सुमधुर आवाज.. आहाहा... उन्हात जाणवणारी काहीली दूर पळवत होता.... तासाभरात आम्ही एका सपाट पठारावर पोहोचलो.. आमच्यासोबतचे मागे राहिलेले भटके येइपर्यंत विश्रांती घेत आणि सर्व एकत्र आल्यावर एक ग्रूप फोटो काढून पुढच्या वाटेने चालू लागलो...
 



          हळूहळू सर्व रत्नांशी ओळख होत होती (खरं सांगते-  सर्वांना "रत्न" हे गमतीने म्हणते आहे कोणी राग मानू नये)  आणि हो ह्या वेळी सर्व वेगवेगळ्या वयातील, आणि क्षेत्रात काम करणारे भटके होते, २४ वर्षाच्या मुलीची आई(चुकलं असेल तर क्षमा असावी), मी तुमच्याच वयाचा आहे मला अहो म्हणू नका असे मिश्कीलपणे म्हणणारे डॉक्टर (एका अर्थी खुद्द एक डॉक्टर आमच्या सोबत आहे म्हणून सर्वांना खूप आधार असल्यासारखं आणि बरं वाटत होतं.), एक रत्न असं होतं की जेव्हा जेव्हा फक्त मुलींचा फोटो काढायचा ठरत होतं तेव्हा ह्या महाशयांनी ऐकलेलचं नसायचं आणि उत्साहात मध्येच येउन उभे रहायचे; असं बऱ्याचदा झालं... आणखी बरेच जण होते सर्वांचाच उल्लेख करत नाही.... 






            पुढे तीन लोखंडी शिड्या चढून आम्ही गणेश दरवाजाजवळ आलो... दरवाज्यावर श्रीगणेशाची मूर्ती पाहून आणखीन प्रसन्न वाटलं... तिथून एक वाट गुहे कडे जाते तर दुसरी हनुमान दरवाजाकडे जाते ... ही वाट जवळजवळ २ फूट उंचीच्या गवतातून जात होती... आणि त्यातही वेगवेगवेगळ्या फुलांची झुडपे त्या गवताचं सौंदर्य आणखी वाढवत होती...अश्या वाटेवरून पहिल्यांदाच चालत होतो... अविस्मरणीय अनुभव.. (निसर्गाच्या वाटेवरून 'निसर्गा'सोबत चालतानाचा अनुभव आहाहा... )आम्ही दोघी तर एकत्र होतोच पण इतका नयनरम्य अनुभव घेताना आमच्या मोठ्या बहिणीला आणि काही मित्र-मैत्रिणींना मिस केलं.. ते  सोबत हवे होते...इतका नैसर्गिक अनुभव कधीच मिळाला नव्हता...




आम्ही गडावर जाणाऱ्या ह्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचलो (हनुमान दरवाजा- जिथे डाव्या बुरुजावर हनुमानाची तर उजव्या बाजूला गणपतीची कोरीव मूर्ती आहे ) तिथून बाहेर पडल्यावर तर काय काय आणि किती डोळ्यांत सामावून घ्यावं असं झालं..निव्वळ अप्रतिम...विलोभनीय...मगाशी सांगितल्याप्रमाणे खालून दिसणारी ती पिवळी शाल प्रत्यक्षात इतक्या जवळून पाहत होतो.. अप्रतिम सौंदर्य , पिवळ्या फुलांचा गालिचाच जणू.... सर्वजण हा नजारा आपापल्या फोन आणि कॅमेरा मध्ये साठवून घेत होते... मी सुद्धा स्वतःला आवरु शकत नव्हते; पण आधी ही पिवळी 'रत्नं' डोळ्यांत साठवून घेतली  मग काही वेळाने हे फोटो काढले...



          काय बोलू शब्दच नाही...फक्त पाहत रहावं तिथून पायच निघत नव्हता... एव्हाना ढग आणि धुक्यानंही आम्हाला सोबत करायचं ठरवलं होतं....त्यामुळेच हा  स्वर्गीय नजारा पाहत राहावा असं प्रत्येकालाच वाटलं असेल...चढताना दिसणारा खालचा परिसर आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा ह्या ढगांखाली लुप्त होत होत्या.. वरून सांधण दरी, हरिशचंद्रगड  दिसतो हे विपुल ने सांगितले होते पण ते पाहता आले नाही.. पुढे आणखी वर चढल्यावर गोलाकार असा दगडी बुरुज आहे... त्यानंतर पुढे पाण्याचं कुंड आहे ...तिथून पुढे सरळ एका पायवाटेने नेढयापर्यंत पोहोचलो (नेढं - डोंगराला पडलेलं छिद्र) तिथे थोडा विसावा घेतला आणि थोडी हलकी फुलकी पेटपूजा करताना आसपास पसरलेली ढग आणि धुक्यांची शाल, सोबत थंडगार वाऱ्याने, "हरिहर" चढताना भरलेली हुडहुडी पुन्हा जाणवत होती..पण 'तो नव्हता'.(तो नव्हता हे एका अर्थाने बरच होतं. नाहीतर ताठ मानेने डोलणाऱ्या ह्या छोट्या फुलांचा अनुभव नसता मिळाला)


           तिथून मग पुन्हा त्याच वाटेने आम्ही  गणेश दरवाजा कडे आणि पुढच्या वाटेने गुहेकडे गेलो.. एका मोठया गुहेत बसून असं गरमागरम पिठलं- भाकरी, भाजी , भात- वरण आणि मिरचीचा ठेचा असं  उत्तम जेवण जेवताना खूप मस्त वाटत होतं.. तर दुसरी कडे  महाराष्ट्रीय नसलेल्या एका रत्नाने पिठल्या कडे बोट दाखवत 'ये क्या स्वीट हे?, कस्टर्ड हे?'असं विचारल्यावर खरंतर साहजिकच कोणालाही हसू येईल, पण एखाद्याला ती गोष्ट माहीतच नसेल तर हसणं बरं नाही म्हणून हसू आवरतं घेत माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या 'रत्ना'ला सांगीतलं  त्याला सांग हे काय आहे.. त्यानंतर ह्या महाशयाने तो कस्टर्डवाला शांतपणे खाली मान घालून जेवतो आहे, आणि त्याला मराठी समजत नाही हे पाहून त्याच्या शेजारीच बसून त्याची टिंगल करत होता..हे त्या बिचाऱ्याला अजूनही माहित नाही, त्यानंतर त्याचा मोर्चा जी सारखी मागे राहत होती तिच्या(आणखी एक रत्न)कडे वळला.. आता तू सर्वात पुढे राहायचं, आपल्याला उशीर होईल वगैरे..मग आम्ही ही त्यात जरा सामील झालो. पण ह्याला अजूनही कळलं नव्हतं की एकी कडे सर्वांची मस्करी करणारं हे रत्न नावाप्रमाणेच उजेड पाडत होतं आणि आम्ही दोघी मात्र मस्त मजा घेत होतो.. सर्वांचं  जेवून होईपर्यंत गप्पा करत असतानाच समोर दगडावर बसलेले आपले पूर्वज(माकडे) दिसले त्यातल्या एका छोट्याश्या माकडाने दोन्ही हातांनी  कसलातरी कागद तोंडात असा पकडला होता जणू बासरीच वाजवत आहे..बघायला गम्मत वाटत होती पण आजही लोक अश्याप्रकारे कचरा फेकून देणं बंद करत नाही ह्याची खंत वाटली.. 

         मनसोक्त जेवल्यावर आम्ही परतीच्या वाटेला लागलो ... पुन्हा तेवढाच पल्ला पार करायचा होता एव्हाना ३ वाजून गेले होते..सकाळीच पोहोचायला उशिर झाल्याने परतायला उशिर होणार हे साहजिकच होतं.. तरी जेवढ्या लवकर उतरता येईल तेवढं बरं असं ठरवून आम्ही पुढेच राहीलो... शिड्यांपर्यंत नेणाऱ्या गवतातल्या वाटेतून पुन्हा एकदा जात असताना गणेशला मागचे लोक वाट चुकले आहेत असं समजल्यामुळे तो मागे गेला, आम्ही पुढचे मग विपुल सोबत उतरू लागलो... शिडया उतरल्यावर वरुणराजा प्रसन्न झाले... ह्या वाटांवरून जाताना पावसाची सोबतही छान वाटत होती... पण जाताना नेहमीप्रमाणे माकडउडया करत जाणारं एक रत्न उतरताना पावसामुळे चक्क तीन वेळा घसरलं.. पुढे पुढे जात होतो मागचे रस्ता चुकल्याने बरेच मागे होते, पावसात जंगलातून जातानाचा अनुभव खूप काही शिकवत होता, तेव्हाच जवळून एका पक्ष्याच्या सुमधुर आवाजाने लक्ष वेधलं, नीट पाहिलं तर काळ्या - पांढऱ्या रंगाचा एक छोटासा पक्षी एवढया पावसातही निवांत गाणं गुणगुणत होता. 
 पाऊस सुरु झाल्याने वेगवेगळ्या दिशेने पाण्याचे ओहोळ वाहू लागले होते, त्यातून, दगडांमधून वाट काढत जात असतानाच अचानक माझ्या पायात गोळा (क्रॅम्प) आला.. त्यामुळे आम्ही जरा थांबलो.... लगेच दगडावर बसून बूट काढले अस्मिताने पायाची हलकीशी मालिश केली.. जरा विश्रांती मिळाल्यावर पायाला बरं वाटू लागल्यावर चला निघूया म्हणत बूट घालत असताना पाय जोरात थरथरायला लागल्यावर सर्वांसोबत स्वतःच स्वतःवर हसणारं  'रत्न' म्हणजे मी कसंबसं हसू आवरत पुन्हा दोन मिनिट थांबून हळूहळू चालत राहिले... थोड्याच वेळात आम्ही रतनवाडीत पोहोचणार असल्याने दुखरा पाय सहन करत होते.. साधारण अर्ध्यातासाने बसपर्यंत पोहोचलो, मागचे येईपर्यंत आम्ही दोघी प्राचीन अमृतेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आलो ज्याचं वैशिष्टय असं कि ते एकाच दगडात सुंदररित्या कोरलेलं मंदिर आहे...




          मग सर्व आल्यावर चहा घेऊन बस मध्ये विराजमान झालो आणि मुंबई च्या वाटा खुणावू लागल्या तसा परतीचा प्रवास सुरु झाला...  शेवटी बस मधून उतरताना सर्वांचा निरोप घेताना एका रत्नाने(ज्याने  आम्हाला शेवट पर्यंत ओळखलंच नव्हतं )पुन्हा एकदा जाणीव करून दिली की हा रतनगड चा ट्रेक मनुष्यरूपी रत्नांसोबतचाही होता... 

        रतनगडचा हा अनुभव अविस्मरणीय अदभूत , शब्दांत खरंतर सांगता येणार नाही अश्या आठवणी देणारा होता... प्रत्येकाने एकदातरी जावं असाच आहे रतनगड.... हा रत्नमयी अनुभव प्रेरणा देणारा होता.. आता हिच अनुभूती मनात साठवून पुढे अश्याच एका सुरेख वाटेवर भेटू केव्हातरी ............ 

( हा एक वैयक्तिक अनुभव आहे, तरी सर्वांचा असल्याने ' रत्न' (फक्त गमतीने ) असा उल्लेख केला आहे , तरी ह्याबद्दल कोणी राग मानू नये हि विनंती... आपल्या प्रतिक्रिया - सूचना सर्व स्वीकारल्या जातील )
धन्यवाद
   
फोटो साभार - सर्व रत्नं - निसर्गा हाटकर, राजेश पाटील, प्रकाश पाटील, विपुल जाधव, प्रियांका खेडेकर आणि अर्थातच मी स्वतः 😀😁😀

_ ©नंदिनी हाटकर



-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'कला' हे  एक असं माध्यम आहे जे तुम्हाला व्यक्त व्हायला  मदत करते, आता पर्यंत तुम्ही माझ्या लिखाणाला दाद दिली व पुढेही द्याल अशी अपेक्षा करते, तुम्हा सर्वांचे धन्यवाद🙏

अशीच एक कला मी व माझी बहीण सादर करु इच्छितो  त्यालाही तुम्ही उत्तम दाद द्याल अशी अपेक्षा करते.

कागदाच्या कलाकृती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.



Comments

  1. खूपच छान... आठवणी जागवल्यास ... मस्तच...

    ReplyDelete
  2. मस्तच लिहीले आहेस

    अप्रतिम लेख आणि अविस्मरणीय रतनगड!!!

    खुप खुप धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून आभार.. गौरव...तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांमुळे पुढें आणखी लिहायला प्रोत्साहन मिळेल... धन्यवाद

      Delete
  3. वाहह खूपच छान माहिती... गडावर जाऊन आल्याचा अनुभव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

न भेटणारी मैत्री.....

अन पुन्हा माणूसकी भेटली.

सरतय वर्ष... काही तरी राहून जातय...